चोपडा : प्रतिनिधी
गुजरआळी भागातील रहिवासी आणि मणिपूरमध्ये सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेले जवान चेतन चौधरी (३४) यांचा शनिवारी अपघाती मृत्यू झाला.
मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात झालेल्या एका अपघातात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. १५ मार्च रोजी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात ३७बीएन बीएसएफची तुकडी कार्यरत होती. याच तुकडीत जवान चेतन चौधरी कार्यरत होते. ११ मार्च रोजी सेवेवरून परत येत असताना इम्फाळ राष्ट्रीय महामार्गावरील सेनापती जिल्ह्यातील चांगौबुंगजवळ सैन्याचा ट्रक दरीत कोसळल्याने तीन जवान ठार झाले होते.
याच अपघातात जवान चेतन चौधरी यांच्यासह काही जवान गंभीर जखमी झाले. जखमी जवानांवर इम्फाळमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या चार दिवसांपासून चेतन चौधरी यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, दि. १५ मार्च रोजी सकाळी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. चेतन चौधरी हे गेल्या १२ वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.