वरणगाव : प्रतिनिधी
वरणगावहून आचेगावकडे जाणाऱ्या व्यक्तीच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराने धडक दिल्याने आचेगाव येथील शरद भास्कर पाटील (७०) यांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास वरणगाव ते बोदवड मार्गावरील नागेश्वर मंदिराचे पुढे काही अंतरावर घडली. शरद पाटील (वय ७०, रा. आंचेगाव) हे दुचाकीने (एमएच १९/ एएस ६९९१) आचेगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकलशी (एमएच २८/बीएस ९१४१) धडक झाली. या अपघातात चालक शेख गनी शेख मौलाना (वय ६६) व अशोक रामदास खराटे (वय ५५) दोघे रा. बोदवड यांचे सह शरद पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना वरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणले असता शरद पाटील – यांना मयत घोषित केले. इतर दोघांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामधे पाठविण्यात आले. दरम्यान, येथे दुपारी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी रुग्णालयामधे भेट देऊन माहिती घेतली. या बाबत वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक फौजदार श्रावण जवरे पुढील तपास करीत आहे.