छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था
पुणे येथील स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे राज्यातील गुन्हेगारी उफाळून येत असतांना आता छत्रपती संभाजीनगरमध्येही एका विवाहितेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. या घटनेत आरोपीने पीडितेवर चाकूचे 15 हून अधिक वार करत तिचा चेहरा विद्रुप करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक तात्यावर नवपुते (19, रा. घारदोन) असे आरोपीचे नाव आहे. चिखलठाणा पोलिसांनी त्याला मंगळवारी अटक केली. आरोपी गत अनेक दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. पण पीडितेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. विवाहिता 2 मार्च रोजी रविवारी सायंकाळी आपल्या शेतात काम करत होती. त्यावेळी तिची सासू शेताच्या दुसऱ्या टोकावर काम करत होती. ही संधी साधून आरोपीने विवाहितेचा गळा दाबून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पीडितेने त्याला प्रतिकार करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने तिचा गळा पकडून तिला जमिनीवर आपटले. तसेच चाकूने तिच्या चेहरा, पोट, मान, हात व डोक्यात 15 हून अधिक वार केले. त्यानंतरही त्याने तिला सोडले नाही. या स्थितीतही तिच्यावर त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे विवाहिता बेशुद्ध पडली. त्यानंतर आरोपीने तिच्या डोक्यात दगड घातला व ती ठार झाल्याचे समजून घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
रात्र होत असल्याने शेताच्या दुसऱ्या टोकाला काम करणारी सासू घराकडे निघाली. तिने सूनेचा शोध घेतला असता ती शेतातच एकेठिकाणी रक्तबंबाळ व बेशुद्धावस्थेत पडलेली आढळली. त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने तिला तत्काळ शहरातील रुग्णालयात उपचारासाठी आणले. पण गजानन महाराज मंदिर परिसरातील एका रुग्णालयाने तिला दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यामुळे तिला अन्य एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोमवारी रात्री उशिरा विवाहिता शुद्धीवर आली. त्यानंतर तिने घडलेला प्रसंग पोलिसांना सांगितला. त्यानंतर आरोपी अभिषेक नवपुतेवर गुन्हा दाखल केला. तिच्या शरीरावर तब्बल 52 टाके पडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे, या प्रकरणी सोमवारी रात्री गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपी गाव परिसरातील एका शेतात लपला होता. पोलिस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, उपअधीक्षक पूजा नांगरे यांनी त्याचा कसून शोध घेण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे, उपनिरीक्षक सतीश पंडीत यांनी शोध घेत आरोपीच्या शेतातून मुसक्या आवळल्या.