पुणे : वृत्तसंस्था
स्वारगेट येथील तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे गेल्या दोन दिवसापासून शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील उसात लपून बसला होता. पोलिसांनी गुनाट गावात जवळपास 50 तास ऑपरेशन राबवले. मात्र तो सापडला नव्हता. अखेर भूक लागल्याने रात्री बाराच्या सुमारास तो गावातील एका नातेवाईकांच्या घरी गेला. तिथे त्याने मला प्रचंड भूक लागली असून काहीतरी खायला द्या, अशी मागणी केली. त्यानंतर नातेवाइकांनी त्याला खायला आणि पाण्याची बाटली दिली. त्याचवेळी दत्तात्रय गाडेने आपल्याला पश्चात्ताप झाला आहे, असे नातेवाईकांना सांगितले. तसेच जे काही केले ते चुकीचे आहे. मला पोलिसांना सरेंडर व्हायचंय, असे देखील तो म्हणाला. त्यानंतर पाण्याची बाटली घेऊन तो निघून गेला. त्याचवेळी नातेवाइकांनी पोलिसांना गाडे आल्याची माहिती दिली आणि त्यानंतर तो लगेचच पोलिसांना सापडला.
दत्तात्रय गाडेची माहिती नातेवाइकांनी दिल्यानंतर पोलिस तात्काळ सक्रिय झाले. पोलिसांच्या 13 टीम या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या होत्या. तसेच डॉग स्क्रॉड देखील तैनात होते. त्यानंतर आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले. तो उसात लपून बसलेला होता. गाडे गेले दोन दिवसापासून उसाच्या शेतातच राहत आणि झोपत होता. मात्र भूक लागल्याने तो नातेवाईकांच्या घरी गेला आणि पोलिसांच्या ताब्यात सापडला.