चाळीसगाव / मुंबई – जळगाव जिल्ह्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असणाऱ्या चाळीसगाव वासियांना आनंदाची बातमी मिळाली आहे, आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या प्रयत्नांनी चाळीसगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून केंद्र व राज्य पुरस्कृत अमृत २.० योजनेंतर्गत थेट गिरणा धरणावरून १५० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे. सदर योजनेमार्फत शहरवासियांना मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी गिरणा धरणावरून वाढीव ४.०२३ दलघमी बिगरसिंचन पाणी आरक्षण प्रस्तावाला मंजुरी मिळविण्यात आमदार मंगेशदादा चव्हाण यांना यश मिळाले असून जलसंपदा मंत्री ना.श्री.गिरीशभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने आज दि.२० फेब्रुवारी २०२५ रोजी शासन निर्णय प्रकाशित केला आहे. त्यामुळे चाळीसगाव शहर वासीयांची सन २०५६ पर्यंतची म्हणजे पुढील ३० वर्षांची पाण्याची चिंता मिटली आहे. हा पाणीदार निर्णय घेतल्याबद्दल आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री.अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री श्री.गिरीशभाऊ महाजन यांचे आभार मानले आहेत.
आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सूचनेनुसार बिगर सिंचन मोठया प्रमाणात पाण्याच्या हक्क (Bulk Water Entitlement) मिळणेबाबत प्रस्ताव तापी पाटबंधारे विभागामार्फत जलसंपदा विभागाला देण्यात आला होता. यापूर्वी चाळीसगाव नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा योजनेसाठी पिण्यासाठी पाणी वापर हक्काचे परिमाण ४.८६ दलघमी मंजूर आहे. आता जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या मान्यतेने सदर योजनेसाठी सन २०५६ ची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव ४.०२३ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे चाळीसगाव वासियांना नवीन तंत्रज्ञानावर आधारित वाढीव क्षमतेची नवीन सुधारित पाणीपुरवठा योजना मिळणार असून कामाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.