भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील चोरवड येथे दारूच्या नशेत एकाने वेटरला शिवीगाळ करून सुरीने वार केल्यामुळे वेटर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना ५ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर रोडवरील हॉटेल भागाईमधील वेटर नजाकत अली उर्फ मेजवान युनूस अली याच्यावर वेटर कमलेश शाळीग्राम जवरे (२४, हल्ली रा. चोरवड, मूळ रा. देऊळगाव गुजरी, ता. जामनेर) याने मानेवर, तोंडावर, डोळ्याच्या वर कांदा कापण्याच्या सुरीने वार करून जखमी केले आहे. दारूच्या नशेत शिवीगाळ करत हे वार केले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक महेश गायकवाड हे करत आहेत.