भुसावळ : प्रतिनिधी
बस स्थानकात बसचा धक्का बसून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे ५:१५ च्या सुमारास घडली. यात महानुभव संन्यासी ललिताबाई प्रमोद चौधरी (७५) यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, बस स्थानकामध्ये मंगळवारी पहाटे बस क्रमांक एमएच-१३ सीयू ७२५७ मागे घेत असताना व त्याच वेळेस महिला महानुभव संन्यासी प्रवासी ललिताबाई प्रमोद चौधरी (७५) या जात असताना, त्याच वेळेस ओबडधोबड जागेवर बसचे मागील चाक दगडावरून निसटले. त्याचा फटका ललिताबाई यांना बसला. त्या जागीच कोसळल्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. महानुभाव ललिताबाई यांनी साधारण वीस वर्षांपूर्वी संन्यास घेतला होता आणि म्युनिसिपल पार्क श्रीकृष्ण मंदिरात त्या नेहमीच येत असत. त्या मंगळवारी कनाशी ता. भडगाव येथे जाणार होत्या. काळाच्या घाल्यामुळे त्यांचा मंगळवारी दुर्दैवी अंत झाला. दुपारी साडेबारा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.
याबाबत डेपो मॅनेजर राकेश शिवदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. यात अनेक वेळा दगडधोंडे बसच्या चाकांमधून निसटून नागरिकांना लागत असतात. त्यात अनेक जण जखमीही झाले आहेत.