चोपडा : प्रतिनिधी
शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा लावत गुरुवारी पहाटे दोन ठिकाणी कारवाई करत गांजा वाहतूक आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सहाजणांच्या टोळीला अटक करत त्यांच्याकडून एकूण १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास चोपडा-शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ सापळा लावण्यात आला. अकुलखेडा बसस्थानक परिसरात दोन संशयित आले. त्यांच्याजवळ ३६ हजार रुपये किमतीचा साडेचार किलो गांजा मिळून आला. यात विजय देवनाथ मोरे (२७, भोरखेडा ता. शिरपूर), अविनाश भिका पाटील (२६, वाघळुद ता. धरणगाव) यांना अटक केली. याचवेळी चारचाकी थांबवून तपासणी केली असता त्यात ४ लाख ७० हजार रूपये किमतीचा ३१ किलो ५०० ग्रॅम गांजा सापडला. या गुन्ह्यात विनोद परदेशी (५२), ज्ञानेश्वर कोळी (३८, पिळोदे, ता. शिरपूर), राजू फिरंगी पावरा (४५), सुनील कोळी (३०, विरवाडे, ता. चोपडा) यांना अटक करण्यात आली.