जळगाव : प्रतिनिधी
अवैध वाळूचा उपसा व वाहतूक सुरूच असून शहर व परिसरातून वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत डंपर व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यामध्ये मेहरुण परिसरातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर एमआयडीसी पोलिसांनी तर रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक करणारे एक डंपर डीवायएसपींच्या पथकाने जप्त केले.
सविस्तर वृत्त असे कि, मेहरुण परिसरातील पिरजादे वाडा परिसरातून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एमएच १९, डीव्ही ८५०६) एमआयडीसी पोलिसांनी पकडले. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने ट्रॅक्टर जप्त केले. याप्रकरणी पोकों गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय बडगुजर करीत आहेत.
रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून वाळू वाहतूक करणारे डंपर (एमएच ०४, ईबी ८८७३) उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या पथकाने पकडले. चालक अनिल नन्नवरे याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. पोउनि समाधान गायकवाड, पोहेकॉ विकास महाजन, सुहास पाटील, रवींद्र मोतीराया, पोकों सचिन साळुंखे, महेश पवार, गोपाल पाटील, चंद्रकांत पाटील यांनी हे डंपर जप्त केले.