भुसावळ : प्रतिनिधी
सुनसगाव येथील ग्रामपंचायत सदस्याच्या गोठ्यास मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने जीवितहानी टळली. कोणीतरी ही आग लावल्याची चर्चा गावात आहे. आग लावण्याचा उद्देश काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत सदस्य व धनगर समाजाचे कार्यकर्ते सुनील परशराम कंकरे यांचा वॉर्ड क्रमांक तीनमध्ये गुरेढोरे व म्हशी तसेच चारा व लाकडे ठेवण्यासाठी गोठा आहे. सुनील कंकरे यांचा दुग्ध व्यवसाय असल्याने या गोठ्यात म्हशी बांधलेल्या होत्या. ३ रोजी गावात रात्री एका महिलेचे निधन झाल्याने गावातील कार्यकर्ते संबंधितांकडे जागरण करण्यासाठी बसलेले होते. यावेळी मध्यरात्री सुनील कंकरे हे घरी गेले असता मध्यरात्री २ वाजता गोठ्यास आग लागल्याचा प्रकार एका महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरडा केला आणि आग लागलेल्या गोठ्याच्या शेजारी झोपडीत झोपलेल्या लोकांना उठवून जागे केले. त्यामुळे वना भिल नामक तरुण पळतच सुनील कंकरे यांच्याकडे आला व माहिती सांगितली. कंकरे हे लगेच गोठ्यात पोहोचले व गायी आणि म्हशी यांचे बांधलेले दोर कापून म्हशी व गायींना बाहेर काढण्यात आले. त्यामुळे गुरांचा जीव वाचला.
गुरांसाठी असलेला चारा, कुट्टी व सरपणासाठी असलेली लाकडे या आगीत जळाली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. गोठ्याच्या पश्चिम दिशेकडून प्रवीण पाटील यांच्या वाड्याची भिंत चढून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ही आग लावली असावी अशी चर्चा गावात आहे. वैमनस्यातून हा प्रकार झाला असावा, असे सांगितले जाते.