जळगाव : प्रतिनिधी
जळगाव ते भुसावळ मार्गावर दूरदर्शन टॉवरजवळ असलेल्या श्री स्वामी नारायण मंदिरातील मूर्ती प्रतिष्ठा महोत्सवासाठी १० ते १७ डिसेंबरदरम्यान जळगाव ते भुसावळ दरम्यान अवजड वाहनांना बंदी राहणार असल्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले आहेत.
भुसावळ मार्गावर दूरदर्शन टॉवर जवळील श्री स्वामी नारायण मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मंगळवारपासून आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे याठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या ठिकाणाहन होणारी अवजड वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत या मार्गावरून अवजड वाहतूक बंद करण्यात येणार असून त्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी केले आहे.
बस, कार, दुचाकींना परवानगी या मार्गावर केवळ अवजड वाहनांना (मालवाहू ट्रक, ट्रेलर व तत्मस वाहने) बंदी आहे. येथून बसेस, कार, अन्य हलकी वाहने, दुचाकींना जाता-येता येणार आहे. मंदिर परिसरात महामार्गावर कोणालाही वाहने लावता येणार नाही, असे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी स्पष्ट केले.
भुसावळकडून धुळ्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी: नाहाटा कॉलेज, जामनेर, नेरी, वावडदा, म्हसावद, एरंडोलमार्गे
भुसावळकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनांसाठी: नाहाटा कॉलेज, जामनेर, नेरी, अजिंठा चौकमार्गे
जळगाव शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या वाहनांसाठी: अजिंठा चौक, नेरी, जामनेरमार्गे
धुळ्याकडून मुक्ताईनगर व छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी : एरंडोल, म्हसावद, वावडदा, नेरी, जामनेरमार्गे.