मुक्ताईनगर : प्रतिनिधी
शहरातील बोदवड रस्ता ते प्रवर्तन चौकच्या दरम्यान राजस्थानी मार्बलजवळ चारचाकीच्या धडकेत मोटारसायकलवरील नगरपंचायत कर्मचारी ठार झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत कर्मचाऱ्याचे नाव मयूर रवींद्र महाजन असे आहे. मयूर महाजन व अतुल वराडे दोघे मोटारसायकलने (एम.एच.१९ ए. एल. ५३४३) जात असताना बोदवड रस्त्यावरील राजस्थानी मार्बल ते साई वॉशिंग सेंटरच्या दरम्यान चारचाकीने क्रमांक (एम.एच. २० सी एच झिरो ५४६) जोरदार धडक दिली. या अपघातात नगरपंचायतचे कर्मचारी मयूर रवींद्र महाजन (३३) यांचा मृत्यू झाला, तर अतुल एकनाथ वराडे (३०) गंभीर जखमी झाले आहेत, अतुल वराडे हेही सिंचन विभागात मुक्ताईनगर येथे कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत.
मयूर महाजन सर्वसामान्य कुटुंबातील असून एकुलते एक होते. त्यांच्यापश्चात आई, वडील, दोन बहिणी, पत्नी, दोन वर्षांची लहान मुलगी आहे. मयूर महाजन यांच्या निधनामुळे शहरात एकच शोककळा पसरली. मुक्ताईनगर पोलिसात चारचाकी चालक राम मोहन हंबर्डे चालकाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक सुरेश मेढे करीत आहेत.