पाचोरा : प्रतिनिधी
बंद घराचे कुलूप तोडून घरी कोणीही नसल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पाच ठिकाणी घरफोडी करीत ४ लाखांची रोकड व दहा तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना दहीगाव संत येथे घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील दहिगाव संत येथील प्रताप बाबूलाल पाटील ( वय ५२) यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दिली आहे. दि. २८ रोजी ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता दि. २९ च्या मध्यरात्री गल्लीतील रमेश गुलाबसिंग पाटील यांच्या घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची चर्चा सुरू होती. प्रताप पाटील यांचा पुतण्या सचिन याने काका प्रताप पाटील यांच्या घरी जाऊन पाहिले असता घराचे कुलूप तोडलेले दिसले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे आढळून आले.
तात्काळ प्रताप पाटील हे गावी येऊन घरातील ठेवलेल्या वस्तू व रोकड लंपास झाल्याचे लक्षात आले. यावरून प्रताप बाबूलाल पाटील यांना रोख २ लाख ६० हजाराची रक्कम व १६ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, १६ भार चांदीच्या साखळ्या असा एकूण २ लाख ९५ हजाराचा ऐवज घरातून चोरी केल्याचे समजले. यावेळी गल्लीतील पाचही बंद घरांचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील दागिने व रोकड लंपास केल्याचे दिसून आले. यात धर्मसिंग राजपूत यांच्या घरचे १२ तोळे सोने व रोकड ३९ हजार रुपये चोरीस गेले. तसेच रमेश गुलाबसिंग पाटील यांच्या घरातील ६० हजार रुपये रोख रक्कम व साडेतीन तोळे सोनेही गेल्याचे आढळून आले. विठ्ठल विजयसिंह पाटील यांच्या घरातील १० हजाराची रोख रक्कम चोरीस गेल्याचे लक्षात आले. एकाच गल्लीतील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४ लाखाची रोकड व दागिने चोरून नेले आहेत.
दहीगाव संत याठिकाणी एकाच दिवशी घडलेल्या या घटनेने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, घरे बंद असल्याबाबतची खबर चोरट्यांना कशी कळली, हे न उलगडणारे कोडे असून त्यामुळे या चोऱ्यांमागे माहितगार किंवा गावातीलच कुणाचा तरी हात असावा, असा ग्रामस्थांचा कयास आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.