मुक्ताईनगर : प्रतिनिधी
तालुक्यातील घोडसगाव येथे मुलीच्या भेटीसाठी आलेल्या पित्याला पूर्णाड फाट्याजवळील हॉटेलसमोर अज्ञात वाहनाने धडक दिली. यात या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. मयताचे नाव विकास रघुनाथ इंगळे (वय ५३) असे आहे. ते वाघाडी ता. रावेर येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता विकास इंगळे हे मुलीला भेटण्यासाठी घोडसगाव येथे आले होते. दरम्यान, सायंकाळी गावात फिरून येतो, असे सांगून घरातून निघून गेले. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मुलीचे नातेवाईक आकाश भालेराव यांनी तिचे पती सागर वानखेडे यांना फोन करून सांगितले की, अज्ञात वाहनाच्या धडकेत तुमचे सासरे जागीच ठार झाले आहे. त्यानुसार मुलगी स्वप्नाली वानखेडे आणि त्यांचे जावई सागर वानखेडे हे ग्रामीण रुग्णालयात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.