भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील हंबर्डीकर चाळ परिसरात शहर पोलिस ठाणे हद्दीतील वयोवृद्धाच्या घरातून चोरट्यांनी ५ लाख ५७ हजारांचा ऐवज लांबविला. याप्रकरणी शहर पोलिसात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडीची घटना ८ ते ९ नोव्हेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि. २६) रात्री शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हंबर्डीकर चाळ परिसरातील हॉटेल घासीलालच्या मागील भागात राहणारे अरुण दोधू चौधरी (६८) हे ८ रोजी दुपारी १२:३० ते ९ रोजीच्या सायंकाळी साडेपाचदरम्यान बाहेर असताना चोरट्यांनी केव्हातरी संधी साधत घराच्या कपाटातून ५ लाख ५७ हजारांचा ऐवज लांबवला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी सर्वत्र मुद्देमालाचा शोध घेतला मात्र काहीही तपास न लागल्याने त्यांनी शहर पोलिसात धाव घेतल्यानंतर २६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शाखाली सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे हे करीत आहेत.
चोरट्यांनी घराच्या कपाटातील दोन लाख २० हजारांची रोकड, ६८ हजार रुपये किमतीचा चपला हार, ६८ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या, ५१ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या, ३० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, ३४ हजार रुपये किमतीची शॉर्ट चैन, पाच हजार रुपये किमतीची कर्णफुले, १७ हजार रुपये किमतीची कर्णफुलांची साखळी, ३४ हजार रुपये किमतीची सोन्याची जुनी चेन, ३० हजार रुपये किमतीची बदामी अंगठी असा एकूण पाच लाख ५७ हजारांचा मुद्देमाल चोरीला गेला. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शहरासह तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.