जळगाव : प्रतिनिधी
सतत आजारी राहत असल्यामुळे आजाराला कंटाळून आत्महत्या करीत आहे, अशी सुसाईड नोट लिहून राहुल आंबादास पाटील (३५, रा. बोरखेडा, ता.धरणगाव, ह.मु. गुजराल पेट्रोलपंप मागे) यांनी आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी (२८ नोव्हेंबर) दुपारी समोर आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील रहिवाशी राहुल पाटील हे पत्नी – व आई यांच्यासोबत जळगावातील गुजराल पेट्रोलपंपाजवळ वास्तव्याला होते. ते खासगी क्लासमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांना पोटाचा गंभीर आजार होता. त्यामुळे त्यांच्या पोटाची दोनवेळा शास्त्रक्रिया देखील झालेली आहे. पोटाच्या या आजाराला कंटाळून त्यांनी गुरुवारी दुपारी ३ वाजता घरात कुणीही नसताना गळफास घेवून आत्महत्या केली. पत्नी घरी आली त्यावेळी हा प्रकार समोर आला. पतीला पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. राहुल यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.