जळगाव : प्रतिनिधी
घरात कोणी नसल्याची संधी साधत २६ हजार रुपये चोरताना सोनी पवार (२४, रा. शिवशक्ती नगर) या मोलकरणीला घरमालक महिलेने रंगेहाथ पकडले. ही घटना २३ नोव्हेंबर रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर परिसरात अॅड. अंजली भुसारी यांचे निवासस्थान असून २३ रोजी त्यांचे पती अॅड. केदार भुसारी हे मालेगाव येथे गेले होते. त्या वेळी अॅड. अंजली व त्यांच्याकडे काम करणारी सोनी पवार या घरी होत्या. काही कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या अॅड. अंजली घरात परत आल्या तर मोलकरणीने कपाटातून २६ हजार रुपये काढून व कपाट पुन्हा लावत असल्याचे दिसले. तिला रंगेहाथ पकडून शहर पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी मोलकरणीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी मोलकरणीला ताब्यात घेतले आहे.