जळगाव : प्रतिनिधी
राजमालती नगरातील सिद्धार्थ माणिक वानखेडे (वय ३६) या तरुणाचा खून झाल्यानंतर तब्बल २७ तासांनी गुरुवारी त्याच्या मृतदेहाचे विच्छेदन झाले. या घटनेचे पडसाद उमटले. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दुसऱ्या दिवशीही तणाव होता. पोलिस व आमदार सुरेश भोळे यांनी समजूत घातल्यानंतर दुपारी दीड वाजता मृतदेह ताब्यात घेण्यात आला.
पूर्ववैमनस्यातून दोन गटात झालेल्या हाणामारीत सिद्धार्थ माणिक वानखेडे याचा बुधवारी मृत्यू झाला होता. याप्रकरणी शहर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी सकाळी नातेवाइकांनी शवविच्छेदन कक्षात मोठी गर्दी केली होती. सुरुवातीला मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे पोलिसांपुढे पेच निर्माण झाला. अतिरिक्त पोलिस बंदोबस्त याठिकाणी लावण्यात आला. गर्दी झाल्याने याठिकाणी तणावाची स्थिती होती, मात्र पोलिसांनी संयमाने प्रकरण हाताळले. त्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर शवविच्छेदन सुरू करण्यात आले. दुपारी दीड वाजता सिद्धार्थ वानखेडे याचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका राजमालतीनगरकडे रवाना झाली. त्यानंतर जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर व बंदोबस्तावरील पोलिस तेथून रवाना झाले.