चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यात बिबट्याचे संकट संपण्याचे नाव घेत नाही. एकापाठोपाठ एक हल्ल्याच्या आणि बिबटे जाळ्यात अडकल्याच्या घटना घडत असतानाही पुन्हा बिबट्याचे दर्शन होत आहे. तालुक्यातील तांबोळे शिवारात कापूस वेचणी सुरू असतानाच बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे बचावासाठी धाव घेणाऱ्या १८ वर्षीय तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबोळे येथील शेतकरी विजय विक्रम पाटील यांच्या शेतात काही महिला कापूस वेचणी करीत होत्या. शेतात विजय पाटील यांचा मुलगा व मुलगी हे देखील होते. १८ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास स्नेहल विजय पाटील (१८) ही भावासह विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेली असता असता त्याचवेळी तिला बिबट्या दिसल्याने तिने जोरात आरोळी मारली. त्यावेळी तिच्या भावाने कापूस वेचणी करणाऱ्या महिलांकडे धाव घेतली तर स्नेहल हिचा पाय घसरल्याने ती विहिरीत पडली.
हा प्रकार समजताच आसपासच्या शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली व स्नेहल हिला विहिरीतून बाहेर काढून चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.