जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील सुरत रेल्वे गेटजवळ राजकीय वादातून सिद्धार्थ वानखेडे (वय ३६) या तरुणाचा खून झाला. ही घटना बुधवारी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर प्रचंड गोंधळ निर्माण होऊन एक जमाव राजमालतीनगरात चालून आला. जमावातील महिला, पुरुषांसह लहान मुलांनी एका घरावर हल्ला चढवत वाहनांचे नुकसान केले. घरावर दगडफेक केली. हा संपूर्ण प्रकार घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. या प्रकारानंतर राजमालतीनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत रेल्वे गेट परिसरात राजमालतीनगर आहे. येथे दीपक माने हे पत्नी, मुलगा, सुना व नातवंडांसह वास्तव्यास आहेत. सुरत रेल्वे गेटजवळ राजकीय वादातून सिद्धार्थ वानखेडे या तरुणाचा खून झाल्यानंतर महिला-पुरुषांचा एक जमाव थेट दीपक माने यांच्या घराकडे चालून आला. तेव्हा घरी त्यांच्या सून अश्विनी व मयूरी मानेंसह नातवंडे होते. जमावातील महिलांनी शिवीगाळ करत मानेंच्या दरवाजाला लाथ मारली. नंतर दगडफेक केली. शिवाय, काही पुरुषांनी तर माने यांच्या घरासमोर लावलेल्या दोन दुचाकींना (एमएच १९, डीएक्स ९१९६आणि एमएच १९ डीजी ४१०७) लाथ मारून खाली पाडत नुकसान केले. अक्षरशः लहान मुले सुद्धा हातात लाकडी फळी घेऊन माने यांच्या घरावर धावून आल्याने अश्विनी माने या भयभीत झाल्या होत्या.
जमावाने कुंडी फोडली यानंतर शिडीला जोरदार धक्का देऊन पाडली. घरातील साहित्याचे नुकसान झाले. या संपूर्ण प्रकारामुळे अश्विनी माने यांच्या डोळ्याला इजा झाली.पोलिसांसह जवानांनी मध्यस्थी करत गोंधळ शांत केला. हा संपूर्ण प्रकार माने यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला. हाणामारीनंतर जखमींना जीएमसीत दाखल करताना केसपेपर काढत असलेल्या अजय पांडुरंग सुरवाडे (वय ५४) यांच्यावरही राजू पटेल गटाच्या १५ ते २० जणांच्या टोळक्यांने हल्ला करून मारहाण केली. जीएमसीच्या सुरक्षारक्षकांनी त्यांची सुटका केली.