जळगाव : प्रतिनिधी
शहरातील नवीन बी. जे. मार्केट येथे एका कॉस्मेटिक्स दुकानात निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रारीवरून धाड टाकून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त केले असून एका संशयिताला ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. दरम्यान, सोबत मतदान यादी, मोबाईल नंबरदेखील सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दि. २० नोव्हेंबर रोजी सार्वत्रिक मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास तक्रारदार विकी भास्कर कोळी (वय ३२) हे नवीन बी. जे. मार्केट येथून जात असताना त्यांना रेडक्रॉस सोसायटीजवळ मार्केटमध्ये काही घोळका दिसला. त्यांनी पाहिले असता, तेथे काही महिलांना पैसे वाटप सुरु असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर निवडणूक अधिकारी गौरव चव्हाण यांनी पोलिसांसह ताफा घेऊन बी.जे. मार्केट गाठले.
तेथे सायली कॉस्मेस्टिक या दुकानात निवडणूक अधिकारी व पोलिसांनी तपासणी केली. तेथे मतदार यादी, मोबाईल नंबर तसेच पंचनामा करून २ लाख ७२ हजार ५०० रुपये जप्त केले आहे. तसेच संशयित संजय भास्कर पाटील (४५, रा. जळगाव) यांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले आहे. पैसे सील करून जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आले आहे. यावेळेला जिल्हापेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.