जळगाव : प्रतिनिधी
सीसीटीव्ही व हायमास्ट लॅम्प लावण्यासाठी वीज पुरवठा बंद करण्यास नकार दिल्याने सब स्टेशनवर जाऊन खासगी कामासाठी हिरालाल गंगाधर पाटील (वय ४९, रा. हर्षवर्धन कॉलनी) यांना दोघांनी मारहाण करुन लॉगशीट फाडले व जबरदस्तीने वीज पुरवठा खंडीत केल्याची घटना बुधवारी रात्री शिवाजी नगरात घडली. याप्रकरणी कुणाल हटकर व त्याच्या सोबत असलेल्या अनोळखी व्यक्तींविरुध्द शहर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
हिरालाल गंगाधर पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवाजी नगर सब स्टेशनच्या लैंडलाइन फोनवर बुधवारी रात्री साडे सात वाजता एक कॉल आला असता तो सुरक्षा रक्षक हेमंत पवार यांनी उचलला. कुणाल हटकर नावाच्या व्यक्तीकडे सीसीटीव्ही कॅमेरा व हायमास्ट लाइट बसवायचे असल्याने शिवाजीनगर भागातील मेन लाइन बंद करा असे सांगत होता.
असे करता येत नाही असे त्याला सांगितले असता आठ वाजता तो एक, दोन जणांना घेऊन सबस्टेशनवर आला व शिवीगाळ करत मारहाण करायला लागला. जबरदस्तीने विना परवानगीने ११ केव्ही गेंदालाल फीडरचा ब्रेकर मुख्य लाइन बंद केली. कार्यालयीन नोंदीसाठी वापरले जाणारे बुक फाडले. त्यामुळे या भागात वीज पुरवठाही बंद राहिला. या प्रकरणी पाटील यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल झाला. दरम्यान, ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.