जळगाव : प्रतिनिधी
महामार्गाला लागून असलेल्या खेडीतील आंबेडकरनगर व भोईवाडा या भागात बंद असलेल्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन चार घरे जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी सात वाजता घडली. अग्निशमन दलाच्या तीन बंबांद्वारे आग विझविण्यात आली. या घटनेत सुदैवाने कोणाला इजा झाली नाही. यात संसार मात्र खाक झाला आहे. घरात दिवा सुरू असल्यामुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. या घटनेत दोन सिलिंडरचा स्फोट झाला आहे.
प्रीती निवृत्ती गाढे यांचे भोईवाड्यात पार्टेशनचे घर असून, तेथे त्या दोन मुलांसह वास्तव्याला आहेत. मंगळवारी त्या मुलांना घेऊन रथोत्सवात गेल्या होत्या. त्याच वेळी सायंकाळी त्यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. आग लागल्याने कपडे, टीव्ही, धान्य जळून खाक झाले. शेजारील लीलाबाई भोई व त्यांच्या मुलाच्या घरासह मंगलाबाई आधार चौधरी यांच्याही घराला आगीची झळ बसली. सर्व घरामधील संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. शेजारील घरातून आवाज व धूर पाहून मंगलाबाई घाबरल्या. लोकांनी त्यांना बाहेर काढले. आशिष शर्मा यांनी अग्निशमन दलाशी संपर्क केल्यानंतर तातडीने बंब दाखल झाले. देवीदास सुरवाडे, रोहिदास चौधरी, महेश पाटील, योगेश पाटील, भगवान पाटील, संजय भोईटे, सरदार पाटील, अश्वजित घरडे, तेजस जोशी, हर्षल शिंदे, निवांत इंगळे, नंदू खडके, रजनीश भावसार या कर्मचाऱ्यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तीन बंबांद्वारे पाणी मारून संपूर्ण आग विझवली.