जळगाव : प्रतिनिधी
बोहरा गल्लीतून सराफ बाजाराकडे पायी जात असलेल्या प्रमोद हिरामण पवार (वय ५१, रा. तामसवाडी, ता. पारोळा) यांच्याजवळ एका पिशवीत २५ लाख रुपयांची रोकड आढळून आली. शनी पेठ पोलिसांनी ही रक्कम जप्त केली असून पंचनामा करुन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधीकडे सुपूर्द केली आहे. दरम्यान, ही रक्कम एका बड्या राजकीय नेत्याची असल्याचे सांगितले जात आहे, पोलिसांनी मात्र त्यास दुजोरा दिलेला नाही. चौकशी सुरु असल्याचे सांगितले.
शनी पेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे, कर्मचारी गिरीश पाटील, अमोल वंजारी, अनिल कांबळे व विक्की इंगळे आदी जण सराफ बाजार परिसरात गस्तीवर असताना बोहरा गल्लीकडून एक व्यक्ती हातात निळ्या रंगाची हॅन्डबॅग घेऊन सराफ बाजाराकडे जात असताना पथकाने त्याला अडविले. पिशवीत काय आहे अशी विचारणा केली असता त्याने काहीच नाही असे उत्तर देत पुढे चालायला लागला. संशय आल्याने पोलिसांनी त्याची बॅग उघडून पाहिली असता त्यात ५००, २०० व १०० च्या नोटांचे बंडल आढळून आले. त्यावर त्याने स्वतःचे नाव प्रमोद हिरामण पवार असे सांगून मी शेतकरी आहे. माझ्याकडे खूप शेती आहे. मी जळगावात सोने घ्यायला आलेलो होतो. असे सांगितलं. मात्र इतक्या मोठ्या रोकड संदर्भात त्याने पोलिसांना ठोस माहिती दिली नाही. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले