जळगाव : प्रतिनिधी
पिंप्राळ्यातील श्रीरत्न कॉलनीत सुरेंद्रकुमार शंकरलाल जैन यांच्या मालकीचे ज्वेलरी दुकान फोडणाऱ्या समीर शेख इकबाल (वय २४, रा.हुडको, रा. पिंप्राळा) याला रामानंद नगर पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली, त्याचा दुसरा साथीदार पसार असून त्याचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गाच्या पाठीमागे पिंप्राळ्यातील श्रीरत्न कॉलनीत सुरेंद्रकुमार जैन यांच्या मालकीचे ज्वेलरी दुकान आहे. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी दुकान बंद केल्यानंतर जैन घरी गेले होते. मध्यरात्री दुकानाच्या शटरचे कुलूप तोडल्याचे शेजारी राहणाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी जैन यांना कळवले. त्यांनी लागलीच दुकानात येऊन पाहणी केली असता दुकानातील ८ हजार रुपये किमतीचे चांदीचे १६ जोडवे, ७ हजार २ रुपये किमतीच्या सोन्याच्या १२ फुल्या व ५०० रुपये रोख चोरी झाल्याचे उघड झाले.
या घटनेनंतर जैन यांनी रामानंद नगर पोलिस ठाणे गाठून तक्रार केली. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोन जणांनी ही चोरी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुरुवारी मध्यरात्री समीर शेख इकबाल याला अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. दुसरा सहकारी फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती तपासी अंमलदार जितेंद्र राजपूत यांनी दिली.