अमळनेर : प्रतिनिधी
येथील विकास प्रवीण पाटील (वय २९) या तरुणाच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून सहा जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील संशयितांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर येथील विकास पाटील याच्याकडून ३ नोव्हेंबर रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास गाडीचे इंडिकेटर तुटले. त्या कारणावरून विकास याला अमळगाव ते जळोद रोडवर अमोल वासुदेव कोळी, मनोज हनुमंत श्रीगणेश, कमलाकर हनुमंत श्रीगणेश, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, रोहित सीताराम पाटील (रा. गांधली व पिळोदा, ता. अमळनेर) यांनी मारहाण केली होती.
त्यात त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मारवड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळाची पाहणीसह त्या ठिकाणी मिळालेल्या पुराव्यांवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवली. त्यानुसार अमोल कोळी, नितीन पवार, हर्षल गुरव तिघांना जामनेर तालुक्यातील नेरी येथून, कमलाकर श्रीगणेश याला पाचोरा येथून तर रोहित पाटील रा. गांधली व मनोज श्रीगणेश रा. पिळोदा येथून ताब्यात घेण्यात आले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील करीत आहे