जळगाव : प्रतिनिधी
फटाक्यांमुळे घराला आग लागून मुलांचे शाळेचे प्रमाणपत्र, ५५ हजार रुपये रोख, मोबाइलसह अन्य वस्तू जळून खाक झाल्याची घटना शनी पेठेतील चंदनवाडीत ३१ ऑक्टोबरच्या रात्री साडेदहा वाजता घडली. पाच दिवसानंतर शनी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शनी पेठेतील रामदेव मंदिराच्या मागे चंदनवाडीत पुनमसिंग सुरेशसिंग राजपूत (वय ४५) हे कुटुंबासह वास्तव्याला आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळीनिमित्त गल्लीत फटाके फोडले जात असताना त्यामुळे घराला आग लागली. यात फायबरचे कुलर, लोखंडी कपाट, मोबाइल, ५५ हजार रुपये रोख, सात ग्रॅम सोन्याचे कानातील झुमके यासह मुलगा जयसिंग याचे इयत्ता पहिली ते ११ वी पर्यंतचे शाळेचे सर्व प्रमाणपत्र, खेळाचे प्रमाणपत्र, बँकेचे पासबुक, मुलगी रुपाली हिचे बँकेचे पासबुक, आधारकार्ड, पॅन कार्ड, आयुष्यमान योजनेचे कार्ड, कपडे व घरातील संसारोपयोगी वस्तू जळून एकूण १ लाख १७ हजार रुपयांचे नुकसान झाले. ही आग घरातील लोकांनीच पाण्याच्या साहाय्याने विझविल्याचे राजपूत यांचे म्हणणे असल्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी सांगितले. याप्रकरणी अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक फौजदार पवार करीत – आहेत.