अमळनेर : प्रतिनिधी
जळोद-अमळगाव रस्त्यावरील खूनप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून, आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर एक जण अद्याप फरार आहे.
मयत विकास पाटील यांचा भाऊ विठ्ठल प्रवीण पाटील याच्या फिर्यादीत म्हटले आहे की, तो दि. २ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलने पिंगळवाडे (ता. अमळनेर) येथे यात्रेसाठी जात होता. गांधली गावाच्या स्मशानभूमीजवळ त्याला गर्दी दिसली. त्याने थांबून चौकशी केली असता, त्याचाच भाऊ व भावाचा मित्र अजित यांचा स्विफ्ट कार (एम.एच. १९ बीजे ४७९१) मधील लोकांशी वाद सुरू होता. कारने धडक दिल्याने विकास याच्या मोटारसायकलचे इंडिकेटर तुटले होते. यातून कारमधील सहा जण वाद घालत होते. त्यांची नावे विचारली असता, अमोल वासुदेव कोळी, मनोज हनुमंत श्रीगणेश कमलाकर हनुमंत श्रीगणेश, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव, रोहित सीताराम पाटील (रा. गांधली व पिळोदा), अशी समजली.
पुढे गेलेला विकास अमळगाव येथे घाबरलेल्या अवस्थेत उभा असताना स्विफ्ट कारमधून आणि मोटारसायकलवर काही जण हातात लाकडी दांडके, लोखंडी रॉड घेऊन आले आणि विकासला धक्काबुक्की करू लागले, म्हणून विठ्ठल याने त्याला जळोद रस्त्यावर पळवले. मात्र, ४०० ते ५०० फूट अंतरावरच कारने धडक देऊन त्याची मोटारसायकल पाडली. सर्वांनी त्याला मारहाण केली आणि ते पळून गेले. विकासला डॉ. अनिल शिंदे यांच्या दवाखान्यात उपचारासाठी आणले. तेथून ग्रामीण रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी विकासला मृत घोषित केले.
सहायक पोलिस निरीक्षक जिभाऊ पाटील, पीएसआय बोरकर, विनोद पाटील, हेड कॉन्स्टेबल भरत ईशी, संजय पाटील, प्रवीण पाटील, संजय पाटील, सुनील तेली यांनी घटनास्थळी भेट दिली. काही आरोपी जामनेरकडे पळाल्याचे एलसीबीला समजले. त्यांनी संशयित अमोल वासुदेव कोळी, नितीन दिनकर पवार, हर्षल नाना गुरव यांना जामनेर परिसरातून आणि मनोज श्रीगणेश व कमलाकर श्रीगणेश यांना पाचोरा येथून अटक केली. आणखी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सातही जणांना मारवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रोहित सीताराम पाटील अद्याप फरार आहे.