भुसावळ : प्रतिनिधी
नागरिकांमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध खरेदी केली जात आहे. बच्चे कंपनीसाठी फटाक्यांची दुकानेही सज्ज झाली आहेत. दरम्यान, भुसावळ नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ३ नोव्हेंबरपर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांबाबत नियमावली तयार करण्यात आली आहे. विक्रेत्यांनी १२५ डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचा फटाका विकल्यास कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी दिला आहे.
भुसावळ न. पा.च्या कार्यक्षेत्रात २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून ते ३ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनी प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांवर रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण मनाई केली आहे. निवासी भागात, मोकळ्या मैदानात व दवाखाने आणि शाळा, महाविद्यालय असलेल्या परिसरात फटाके फोडताना किती डेसिबल आवाज असावा, याबाबत प्रदूषण मंडळाचे नियम आहेत.
फटाक्यांची विक्री करताना विक्रेत्याने १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके विकू नये, अन्यथा विक्रेत्यावर कारवाई करण्याच्या सूचना मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी दिल्या आहेत. १२५ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके फोडणाऱ्यांवरही नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मोठे फटाके व १२५ पेक्षा अधिक डेसिबलपेक्षा अधिक आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांच्या विक्री व वापरावर नगरपालिकेने बंदी घातली आहे.