जळगाव : प्रतिनिधी
जळगाव ते भुसावळ दरम्यान महामार्गावर दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या सात वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. महामार्ग सुरक्षा पथक केंद्रातर्फे ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ म्हणून कारवाई केली आहे. ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी गावातच साजरी व्हावी याकरिता अनेक जण सुट्टया टाकून आपल्या गावी येतात. यामुळे महामार्गावर खाजगी वाहनाची वाहतूक वाढल्याचे दिसून येत आहे. अनेक वाहनचालक मद्यपान करून गाड्या चालवितात. यातून अपघात घडतात, अपघातावर नियंत्रण करतायावे याकरिता महामार्ग सुरक्षा पथक केंद्रातर्फे महामार्गावर ठिकठिकाणी तसेच साकेगाव व नशिराबाद जवळील टोल नाक्यावर वाहनांची तपासणी केली जात आहे. वाहन चालक मद्यधुंदीत आहेत की नाही? याची शहानिशा केली जाते. तपासणी दरम्यान सात वाहन चालक दारू पिल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून पास व दहा हजार प्रमाणे दंड आकारण्यात आला आहे.
महामार्गावर अपघाताचे प्रमाणे कमी करण्यासाठी दारु पिऊन महामार्गावर वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. महामार्ग सुरक्षा पथक केंद्र पाळधीचे प्रभारी अधिकारी मोहम्मद अली सयद यांचे पथकांकडून वाहन तपासणी करण्यात येत आहे. यात दोषींवर कारवाई केली जात आहे.