जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील पहूर जवळ जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी संध्याकाळी ७ वाजता नाकाबंदी दरम्यान संशयास्पद कारमधून सव्वा लाखांचा मद्य साठा व साडेसहा लाखांची कार असा पावणेआठ लाखांचा मुद्देमाल पहूर पोलिसांनी जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहिता लागू केली असल्याने पोलिस दलाच्या वतीने नाकाबंदी सुरू आहे. या दरम्यान पहूर जवळ जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सचिन सानप, पोलिस उपनिरीक्षक भारत दाते, कर्मचारी गोपाळ माळी, विनोद पाटील ज्ञानेश्वर ढाकरे व हेमंत सोनवणे यांच्या पथकास एमएच२०/इइ३०९७) छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी संशयास्पद कार आढळली.
पथकाने कार थांबवून चालक दिलीप अशोक पाटील (धुळे) याची चौकशी करून कारची तपासणी केली. चालकाचे बोलणे संशयास्पद आढळले. कारमध्ये १ लाख २५ हजार ४३० रूपये किमंतीचा देशी-विदेशी अवैध मद्यसाठा आढळला. या मद्यसाठ्यासह साडेसहा लाखांची कार असा ७ लाख ७५ हजार ४३० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून संबधित चालकाला अटक करण्यात आली आहे.