जळगाव : प्रतिनिधी
सासरच्या त्रासाला कंटाळून भारती मुकुंदा सोनवणे (३०) या विवाहितेने आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून पतीसह सासू व दिराविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात भारती यांच्या आई प्रमिला सुखदेव इंगळे (५४, रा. कांचननगर) यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भारती यांचा विवाह सन २०१३ मध्ये पिंप्री, ता. चोपडा येथील मुकुंदा पुरुषोत्तम सोनवणे याच्याशी झाला होता. त्यानंतर कौटुंबिक अडचणी सांगून सासरच्या मंडळींनी पैशाची मागणी केल्याने वेळोवेळी रक्कम दिली. त्यानंतर नवीन घर घेण्यासाठी सहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली.
घरासाठी सहा लाख रुपये मागितल्यानंतर विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी रोख ३० हजार, नंतर एका बँकेचा दीड लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, सहा लाख रुपयांची मागणी पूर्ण न झाल्याने विवाहितेचा छळ केला जाऊ लागला. कंटाळून विवाहितेने ९ ऑक्टोबर रोजी विदगाव ते जळगावदरम्यान पुलावरून तापी नदीत उडी घेत आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येस सासरची मंडळी कारणीभूत असल्याची फिर्याद विवाहितेच्या आईने दिल्याने पती मुकुंदा सोनवणे, सासू मंगलाबाई सोनवणे व दीर या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अनंत आहिरे करीत आहेत.