जळगाव : प्रतिनिधी
व्याजाने पैसे देण्यासाठी आपले स्त्रीधन गहाण ठेवण्यासाठी दिले होते. मात्र काही दिवसांपासून त्यांनी ते परत मिळविण्यासाठी संशयितांकडे तगादा लावला होता. परंतु मारेकऱ्यांनी नवाल यांचा खून करण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार त्यांना पैसे देण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरी जावून त्यांचा निघृण खून केल्याची कबुली संशयीत मारेकऱ्यांनी पोलिसांनी दिल्यानंतर खूनाचा उलगडा झाल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पंचमुखी हनुमान मंदिरामागे असलेल्या रणछोड नगरात सुवर्णा राजेश नवाल (वय ५८) या महिलेच्या डोक्यात अवजड वस्तू डोक्यात टाकून त्यांचा खून केल्याची घटना गुरुवारी घडली होती. घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोधार्थ तपासचक्रे फिरविली. यावेळी त्यांना मयत सुवर्णा नवाल यांनी अनेक जणांना व्याजाने पैसे दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो तपासाचा धागा पकडून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, नवाल यांनी काही दिवासंपुर्वी आपले स्त्रीधन सराफ व्यावसयीकाकडे गहाण ठेवून त्या मोबादल्यात मिळालेली रक्कम ही त्यांच्या ओळखीची सरला धर्मेंद्र चव्हाण (वय ४२, रा. शिवकॉलनी) यांच्या मध्यस्तीने राजेंद्र उर्फ आप्पा रामदास पाटील (वय ५८, रा. म्हसावद, ह. मु. शिवकॉलनी) याला दिले होते.
तसेच दसरा, दिवाळीसाठी पुजेला स्त्रीधन पाहिजे असल्याने सुवर्णा नवाल यांनी सरला हीला स्त्रीधन परत सोडवून देण्यासाठी तिच्याकडे तगादा लावलेला होता. खूनातील मुख्य संशयित लालबाबू रामनाथ पासवान (वय ४३, रा. सम्राट कॉलनी) याच्या पत्नीने सरला चव्हाण हीच्या माध्यमातून सुवर्णा नवाल यांच्याकडून ६० हजार रुपये व्याजाने घेतले होते. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून लालबाबू याने व्याज देखील थकविले असल्याने मयत महिलेने त्यांच्याकडे देखील पैशांसाठी दररोज सकाळपासून फोन करुन तगादा लावला होता.