फैजपूर : प्रतिनिधी
मागील भांडणावरून दगडफेक आणि हाणामारी होऊन त्यात १४ जण जखमी झाले. भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसावरही चाकूहल्ला झाला. यात सहा जणांना अटक आणि ५०-६० जणांवर दंगलीसह दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही घटना बामणोद, ता. यावल येथे बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, हेकॉ. विकास सोनवणे असे या जखमी पोलिसाचे नाव आहे. बामणोद गावात परिस्थिती नियंत्रणात आहे. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. दगडफेक आणि हाणामारी होत असल्याची माहिती मिळताच पोलिस विकास सोनवणे हे घटनास्थळी पोहचले.
जमावाने त्यांच्यावरही दगडफेक केली तर एकाने त्यांच्यावर चाकू मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो वार चुकवला असता पायाला जखम झाली. याप्रकरणी सुपडू दगडू सोनवणे (१८) यांच्या फिर्यादीवरून ६६ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेकॉ. विकास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा तसेच जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे