जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एसटी वर्कशॉपसमोरील गॅरेज, कुशन व रेक्झिन विक्रीच्या गोडावूनसह बाजूच्या तीन दुकानांना भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. या आगीत दुकानाच्या बाहेर लावलेल्या चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले असून, याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेख साबीर इस्लाम (वय ४५, रा. सालार नगर) यांचे एसटी वर्कशॉपच्या समोर कुशन व रेक्झिनचे गोडावून आहे. बुधवारी १०:३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कुशन व रेक्झिनच्या गोडावूनला भीषण आग लागली. आग एवढी भयंकर होती की, अग्निशमन विभागाचे पथक येण्याआधीच बाजूला असलेल्या सुधीरचंद मन्ना यांच्या गॅरेजच्या शेडला व अशोक गुलाब महाजन यांच्या चहाच्या दुकानातही आग पसरली. या आगीची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल झाले.