नागपूर : वृत्तसंस्था
देशातील हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने 48 जागा जिंकत बहुमत मिळवले आहे. निकालाआधी हरियाणात काँग्रेस विजयी होणार, असा विश्वास काँग्रेसच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात होता. मात्र निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट झाले. हरियाणातील निकालानंतर ठाकरे गटाकडून काँग्रेसवर टीका होत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता, कालपर्यंत हम साथ साथ है म्हणणारे आता हम आपके है कौन असे म्हणत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपावर देखील भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरे गट काल निवडणूक निकालामुळे भाजपला घेरण्याची संधी पाहत होते. हरियाणामध्ये भाजप कधी हरतो आणि आम्ही त्यांच्यावर हल्ला करतो याच तयारीत ते होते. परंतु, त्यांना संधी मिळाली नाही. देशाचा मूड काय आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कालपर्यंत हम साथ साथ है म्हणणारे हे तिन्ही पक्ष आता हम तुम्हारे है कौन, असे म्हणत आहेत, अशी टोला फडणवीस यांनी लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी तयार केलेला फेक नरेटिव्ह हरियाणा विधानसभा निवडणुकीत संपुष्टात आला आहे, असेही फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीतील जागावाटपाबाबत देखील माहिती दिली. महायुतीतील जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. आमचा जागावाटपाचा 80 टक्के पेपर सोडवला आहे. आता 20 टक्के पेपर बाकी असून तो देखील लवकरच सोडवणार आहोत. तो सोडवल्यावर त्याची माहिती तुम्हाला देण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.