जळगाव : प्रतिनिधी
किराणा साहित्यासह सर्वच वस्तूंचे भाव वाढत असताना चोरट्याने सुपर शॉपमधून रोख रकमेसह तांदळाच्या २५ गोण्या, तेलाचे १० बॉक्स (१ एक लिटरचे १०० पाऊच) चोरून नेले. ही चोरी करताना बाहेरील सीसीटीव्ही कॅमेराला कापड बांधून व आतील कॅमेरा तोडून चोरट्याने चोरी केली. ही घटना दि. ४ ते ५ ऑक्टोबर दरम्यान शेरा चौकात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, किराणा व्यावसायिक कच्छी इब्राहिम अब्दुल सत्तार (५१, रा. शेरा चौक) यांचे घरापासून काही अंतरावर सहाना सपर शॉप आहे. ४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने सुपर शॉपच्या बाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याला कापड बांधन दोन शटरपैकी एका शटरचे कुलूप तोडले. तसेच दुकानात गेल्यानंतर तेथील कॅमेरा तोडला व दुकानातून रोख पाच हजार रुपये, ५० हजार रुपये किमतीच्या तांदळाच्या २५ गोण्या, १० हजार रुपये किमतीचे तेलाचे १० बॉक्स असा एकूण ६५ हजारांचाचा मुद्देमाल चोरून नेला.
शनिवारी (५ ऑक्टोबर) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कच्छी इब्राहिम हे दुकानावर गेले व त्यांनी एका बाजूचे शटर उघडले असता दुकानात साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले. बाजूचे शटर पाहिले असता त्याचे कुलूप कापलेले होते व तेथेच करवतही पडलेली होती.