अमळनेर : प्रतिनिधी
शहरात अज्ञात चोरट्यांनी एका वृद्धेची सोन्याची पोत आणि जबरदस्तीने एकीचे दहा हजार रुपये लांबविले. या घटना ३० रोजी घडल्या. टाकरखेडा येथील कमलबाई यशवंत पाटील (७५) ही महिला शासनाच्या निराधार योजनेचा लाभ मिळण्यासाठी हयातीचा दाखला देण्यासाठी अमळनेरात आली होती. एक वृद्ध आणि एक तरुण दोघेजण तिच्याकडे आले आणि तिला म्हणाले, तू पूजा करून घे. तुझे चांगले होऊन जाईल. ती वृद्धा नाही म्हणत असताना त्यांनी जबरदस्ती केली. हातातील कागद घेऊन त्यांनी तिला गळ्यातील मंगळसूत्र काढून कागदाच्या पुडीत ठेवले व ते तिला जपून ठेवायला सांगत असताना हातचलाखी करून मंगळसूत्र गायब केले. थोड्या वेळात वृद्धा भानावर येताच तिला मंगळसूत्र गायब झाल्याचे कळले.
दुसऱ्या घटनेत ताडेपुरा भीमनगर भागातील सुमनबाई धाकू बैसाणे (६५) ही महिला ११ वाजेच्या सुमारास स्टेट बँकेत पेन्शन घेण्यासाठी आली होती. पेन्शन घेतल्यानंतर महिला एका स्वीट मार्टमध्ये आली असता, एकजण आला आणि त्याने महिलेला काहीतरी सांगून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला व पैसे मागितले. महिला १०० रुपये देत असताना त्यांनी संपूर्ण १० हजार रुपये हिसकावून नेले. घटनेची माहिती मिळताच पोनि विकास देवरे यांनी पोकों नीलेश मोरे, गणेश पाटील यांना घटनास्थळी पाठविले.