जळगाव : प्रतिनिधी
मुंबई येथे सहकुटुंब उपचारासाठी गेलेल्या दिलीपकुमार रामदास साळुंखे यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी ५४ हजार ५०० रुपयांसह मोबाइल व चांदीचे दागिने असा एकूण ९४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (२७ सप्टेंबर) रात्री मोहननगरात घडली. रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साळुंखे हे दि. २१ सप्टेंबर रोजी सहकुटुंब मुंबई येथे रुग्णालयात गेले आहेत. त्यामुळे बंद असलेल्या त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. घरात असलेले रोख ५४ हजार ५०० रुपयांसह २० हजार रुपये किमतीचा मोबाइल, ३०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या गणपती मूर्ती असा एकूण ९४ हजार ५०० रुपयांचा ऐवज, तसेच महत्वाची कागदपत्रे चोरट्यांनी चोरून नेली.
घरफोडी झालेल्या मोहननगर परिसरात गेल्या दोन आठवड्यांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याचे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. तोंडाला मास्क लावून तिघे जण दुचाकीवर येत असल्याचे काही जणांना पाहिले. तसेच हा प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला आहे. चोरट्यांमुळे या परिसरात दहशत पसरली असून या परिसरात रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे