अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मुडी गावातील रहिवासी असलेला तरुण आणि त्याच्या वडिलांना एकाच दिवशी नियतीने हिरावून नेले. मुडी येथील रहिवासी व सध्या जालना येथे वास्तव्यास असलेल्या सूर्यवंशी परिवारातील गौरव राजेंद्र सूर्यवंशी (३८) यांचे अल्पशा आजाराने २६ रोजी पहाटे २ वाजता निधन झाले. त्याचे वडील राजेंद्र रामचंद्र सूर्यवंशी (६८) यांचे २६ रोजी रात्री १० वाजता निधन झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र सूर्यवंशी हे जालना येथे तालुका कृषी अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. ते छत्रपती संभाजीनगर येथे १५ दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. पत्नी त्यांची देखरेख करीत होती.दरम्यान, पोटाच्या विकाराने गौरव हा देखील छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल होता. रात्री अचानक पोटात रक्तस्त्राव झाल्याने २६ रोजी पहाटे २ वाजता त्याने निरोप घेतला तर वडीलदेखील अखेरचे क्षण मोजत असताना व्हेंटिलेटरवर होते. २६ रोजी सायंकाळी ५ वाजता गौरव याच्यावर मुडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले तर रात्री १० वाजता वडील राजेंद्र सूर्यवंशी यांचाही मृत्यू झाल्याने त्यांच्यावर २७ रोजी मुडी येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच दिवशी वडीलांसह मुलाचे निधन झाल्याने सूर्यवंशी परिवारावर शोककळा पसरली आहे.
राजेंद्र सूर्यवंशी यांचे साहू, कळमसरे येथील डॉ. सतीश सोनवणे (मुडी) यांचे दोन दिवसापूर्वीच अल्पशा आजाराने निधन झाले होते. राजेंद्र यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. राजेंद्र हे मुडी येथील रहिवासी व पुणेस्थित निवृत्त शिक्षक रमेश रामचंद्र सूर्यवंशी यांचे लहान बंधू होत. गौरव याच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.