जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील नांद्रा येथे शेताच्या बांधावर बनावट खते आणून विक्रीप्रकरणी चार जणांना अटक केली. त्यांना २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातून महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बनावट खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी आणले जात असल्याच्या तक्रारीवरून कृषी विभागाच्या भरारी पथकाने नांद्रा, ता. जळगाव येथे बांधावर छापा टाकून साठा जप्त केला होता. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यात शहादा येथील मे. दक्षकमल ट्रेडर्सचे मालक चंद्रकांत पाटील, दिनेश पाटील, महेश माटे, अलताफ शेख मो. हनीफ यांना अटक करण्यात आले. तपासाधिकारी पोलिस निरीक्षक महेश शर्मा यांनी चौघांना न्यायालयात हजर केले असता २७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. यातील जोधा पंपानिया, भरतभाई यांचा शोध घेत आहे.