चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील भऊर शिवारात झाडावरून बिबट्याने उडी घेत शेळ्यावर हल्ला चढविला यात पाच शेळ्या ठार झाल्या आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली. याबाबत वन विभागाने पंचनामा केला आहे. परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भऊर शिवारात जामदा स्टेशनजवळ ज्योती किशोर पाटील यांचे शेत आहे. त्या शेतातच राहतात. शेतात तारेच्या जाळ्यात शेळ्या बांधलेल्या होत्या. गुरुवारी रात्री बिबट्याने हल्ला केल्याचे त्यांनी पाहिले. बिबट्या गेल्यानंतर त्यांनी पाहिले असता चार शेळ्या मृत झालेल्या अवस्थेत आढळून आल्या. तर एका शेळीचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला. त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. या घटनेचा पंचनामा कर्मचाऱ्यांनी केला.
चाळीसगाव तालुक्यातील पिंपरखेड, पिंपरखेड तांडा व शिवापूर या परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. शेतात, रस्त्याने जाताना बिबट्या आढळून आला आहे. यामुळे शेतकरी भयभीत झाला आहे. दोन दिवसांपूर्वी संध्याकाळी मनोज ठुबे हे गाडीवर जात असताना बिबट्याने त्यांच्या गाडीसमोरून उडी मारून दुसऱ्या शेतात पलायन केले. मंगळवारी दुपारी मच्छिंद्र ठुबे यांचेही शेतात तर रात्री पिंपरखेड तांडा परिसरात नदी जवळील शेत वस्तीजवळ बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. याबाबत चाळीसगाव वन विभागाला वेळोवेळी माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. शेतकरी व पशुधनाला धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने याबाबत दखल घ्यावी. परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पिंपरखेड, पिंपरखेड तांडा, शिवापूर भागातील नागरिकांनी केली आहे. जर वन विभागाने काही कारवाई केली नाही तर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.