जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त असून ते कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन मार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.
यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी २०२१ मध्ये जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी व त्याबाबत योग्य ते नियोजन, अंमलबजावणी व निर्णय या कृती दलामध्ये घेण्यात येतात.
त्यानुसारच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित सर आणि मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांच्या जिल्हा कृती दल बैठकीतील सूचनांनुसार सक्षम बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, एसबीसी-३ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य,पंचायत,शिक्षण महिला व बालकल्याण आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग मधील तालुकास्तरीय तसेच क्लस्टर मधील अधिकारी व कर्मचारी अशा ७५ अधिकारी यांना बालविवाह निर्मूलन चॅम्पियन्स प्रशिक्षण हॉटेल फोर सिझन क्रिएशन, जळगाव येथे देण्यात आले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन जिल्हा समूह संघटक राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान प्रवीण जगताप, तसेच पंचायत, महिला बालकल्याण, शिक्षण, जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या प्रतिनिधी, एसबीसी ३ प्रकल्प प्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक कृपाली बिडये, सोनिया हंगे यांच्या हस्ते करण्यात आले.
सदरील प्रशिक्षणामध्ये तालुकानिहाय बालविवाहाची कारणे, महाराष्ट्रातील बालविवाहांचे प्रमाण, बालविवाह निर्मूलनासाठी सुरू असलेल्या ‘सक्षम’ प्रकल्पाविषयी माहिती, बालकांचे हक्क, बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६, बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५, पोक्सो कायदा २०१२, विभागनिहाय नियुक्त केलेल्या ईसीएम चॅम्पियन्स यांची भूमिका व जबाबदारी, त्यामध्ये बालविवाह निर्मूलनासाठी कार्यान्वय योजना आखून त्याप्रमाणे नियोजन करणे, साप्ताहिक देखरेखीचे अहवाल तयार करणे व त्यांचा नियमितपणे आढावा घेऊन कार्यालयास सादर करणे, बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यांचा अहवाल नियमितपणे गुगल लिंक मध्ये भरणे, जिल्हा कृती आराखड्यासाठी सर्व विभागांचे सहाय्य व नियोजन, केलेल्या कार्यांनुसार जिल्हा कृती दल बैठकीमध्ये सादरीकरण अहवाल तयार करणे इत्यादी गोष्टींची माहिती व मार्गदर्शन सदरील प्रशिक्षणामध्ये करण्यात आले.
या प्रशिक्षणासाठी प्रमुख प्रशिक्षक म्हणून एसबीसी-३ चे बालविवाह निर्मूलन प्रकल्प प्रमुख नंदू जाधव, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक सोनिया हंगे, कृपाली बिडये यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले. कार्यक्रमासाठी एसबीसी-३ वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे,प्रकल्प समन्वयक श्रीकांत भोरे, सहाय्यक प्रकल्प समन्वयक रुचिका इंगळे, कम्युनिकेशन समन्वयक रूचिका अहिरे, यांनी प्रशिक्षण यशस्वितेसाठी सहकार्य केले.