चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील धामणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, विकासो संचालक यांनी आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
सरपंच लुभान बळवंत जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य एकनाथ सुभाषराव निकम, मनोज प्रभाकर निकम, दिलीप गोविंदराव जगताप, विकासो संचालक लालचंद जगन्नाथ मोरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे, संदीप प्रभाकर निकम, पुंडलिक माधवराव मोरे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचा रुमाल टाकून सर्वांचे स्वागत केले.
यावेळी मार्केट संचालक कमिटी संचालक नवल पवार, माजी जि प सदस्य अनिल गायकवाड, सर्वोदय चे संचालक प्रशांत पाटील, भाजपा गटप्रमुख सुनील पवार, भूषण पाटील, शिवदास महाजन, ताराचंद मोरे आदी उपस्थित होते.सदर पक्षप्रवेश वेळी प्रतिक्रिया देताना आमदार चव्हाण यांनी सांगितले की, गेल्या ४.५ वर्षात विकासकामे करत असताना कुठल्याच गावात पक्ष, गट तट असा भेदभाव केला नाही. दोन गावांना जोडणारे रस्ते, सभामंडप, गावंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा योजना आदी भरघोस विकासकामे दिल्यामुळे इतर पक्षातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांचा देखील भारतीय जनता पक्षाप्रति विश्वास वाढत आहे. तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांनी प्रभावित होत धामणगाव येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी प्रवेश केला आहे. महाविकास आघाडी कडे विकासात्मक नेतृत्वाचा अभाव असल्याने आगामी काही दिवसात अनेक पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.