जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील लोंढरी बु., येथे पैशाच्या व्यवहारातून जावयाने सासऱ्याच्या पोटात चाकू मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जावई अटकेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई अमोल कृष्णा ठुबे (लोंढरी) याच्याकडे सासरे कैलास रामधन पाटील (सवतखेडा) यांचे पैसे घेणे होते. या व्यवहारासाठी अमोल याने बुधवारी सासरे कैलास पाटील यांना घरी बोलावून घेतले. यादरम्यान दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीत रूपांतर झाले. यावरच अमोल न थांबता त्याने चक्क सासऱ्याच्या पोटात खोलवर चाकू घालून आतडे बाहेर काढून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या जबाबात कैलास पाटील यांनी म्हटले आहे. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, पोलिस कर्मचारी राहुल पाटील, गोपाळ गायकवाड, सागर गायकवाड, ज्ञानेश्वर ढाकरे यांनी धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी करून परिस्थिती हाताळली. अमोल ठुबे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. कैलास पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अमोलविरुद्ध बीएनएस ११८ (२) ३५२ याअंतर्गत पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोलिस करत आहेत.