सोलापूर : वृत्तसंस्था
लाडकी बहीण योजनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या भावांसाठी स्टायपंड देण्याच्या योजनेची घोषणा केली. बारावी झालेल्यांना ६ हजार रुपये, डिप्लोमा झालेल्यांना ८ हजार, पदवी (डिग्री) झालेल्या तरुणांना महिन्याला १० हजार रुपये देणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी आज बुधवारी (दि.१७) पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्ताने बोलताना जाहीर केले. तो वर्षभर कारखान्यात अप्रेंटशिप करेल आणि त्याला तिथे नोकरी लागले. यामुळे कौशल्यपूर्ण असे मनुष्यबळ उद्योजकांना मिळेल. पण अप्रेंटशिपचे पैसे सरकार भरेल, असे शिंदे यांनी सांगितले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन सलग तिसऱ्यांदा प्रथेप्रमाणे शासकीय पूजा केली. यावेळी विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे, एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी मागितल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच गेली तीन वर्षे ज्या प्रामाणिकपणे जनतेसाठी काम करण्याची संधी मिळाली त्याच जोमाने अधिक काम करण्याचे बळ मिळावे असे मागणे मागितल्याचे ते म्हणाले.
याआधी सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात २८ जून रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य राज्य सरकारतर्फे देण्यात येणार आहे. सुरुवातीला एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल, असे जाहीर केलेल्या सरकारने नंतर एकाच कुटुंबातील दोन महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल, अशी घोषणा केली. आता लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने लाडका भाऊ योजना जाहीर केली आहे.