जळगाव : प्रतिनिधी
रेल्वेतून प्रवास करताना धावत्या रेल्वेतून पडून, वेगवेगळ्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. परप्रांतीय तरुणाचा रविवारी सकाळी ६ वाजता माहेजी रेल्वेस्थानकाजवळ तर एका प्रौढाचा भुसावळ रेल्वे स्टेशन जवळील आउटरजवळ मृत्यू झाला आहे. दोन्ही घटनांबाबत रेल्वे पोलिसांकडे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सोनाराम सोरेन (वय ४०, रा विष्णूवेडा, पोस्ट खुडीसर पितोड, जि. घिरडी, झारखंड) हा तरुण मुंबईत कामानिमित्त वास्तव्याला होता. दरम्यान, रविवारी सकाळी ६ वाजता सोनाराम हा त्याचा मित्र मुसुदन टुडू याच्यासोबत मुंबईहून झारखंडकडे जात असताना माहेजी रेल्वे स्टेशनजवळ तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. मयत सोनाराम हा मुंबई येथील ग्रँड रोड येथील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव रेल्वे स्थानकाचे पोलिस कॉन्स्टेबल सचिनकुमार भावसार यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेबाबत जळगाव रेल्वे स्टेशन पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दुसऱ्या घटनेतील मयताचे नाव अब्दुल शकील अब्दुल रफी (वय ५२, रा. भडशिपनी, ता. कारंजा, जि. वाशिम) असे आहे. अब्दुल शकील हे रेल्वेतून प्रवास करत असताना शनिवारी सकाळी ६ वाजता भुसावळ रेल्वे स्थानकाज- वळील आउटरजवळ धावत्या रेल्वेतून ते खाली पडले. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान, शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला