जळगाव : प्रतिनिधी
पत्नी व तिच्या प्रियकराने पतीला बेदम मारहाण केली. ही मारहाण व पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे गावात बदनामी झाल्याने जबर धक्का बसलेल्या पतीने विष प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान ४ रोजी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, आत्महत्येस कारणीभूत ठरलेली पत्नी व तिचा प्रियकर दोघांविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील एका गावातील तरुण १५ जून रोजी रात्री साडेनऊ वाजता दुसऱ्या गावात राहत असलेल्या प्रेयसीच्या घरी गेला. तेथे या तरुणासह मृताची पत्नी यांनी मारहाण करून त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. पत्नीच्या अनैतिक संबंधाची गावात चर्चा होऊन बदनामी झाली. या प्रकारातून तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली. मयताच्या भावाने तक्रार दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ५ जुलै रोजी मयताची पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.
पत्नीच्या अनैतिक संबंधामुळे गावात बदनामी झाल्याने तरुणाने २ जुलै २०२४ रोजी विष प्राशन केल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना ४ जुलै रोजी रात्री १०.३० वाजता तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. या घटनेचा तपास श्रीकांत ब्रदर करीत आहे.