नवी दिल्ली : वृत्तसंस्था
कुवेतमध्ये सहा मजली इमारतीतील अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या ४९ जणांपैकी ४८ जणांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे. त्यानुसार मृतांमध्ये केरळच्या २४ जणांसह ४५ भारतीयांचा समावेश असून तीन जण फिलिपाइन्सचे नागरिक आहेत. भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणण्यासाठी भारतीय वायुदलाचे एक विमान सज्ज ठेवण्यात आले आहे.
यासाठी केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंह हेदेखील कुवेतमध्ये दाखल झाले आहेत. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवेतमधील दुर्घटनेबाबत आढावा बैठक घेतल्यानंतर पंतप्रधान मदतनिधीतून मृत भारतीयांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली. तर केंद्र सरकार, केरळ सरकार आणि दोन व्यापाऱ्यांकडून केरळमधील मृत कुटुंबाच्या वारसांना एकूण १४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
कुवेतच्या मंगफ जिल्ह्यात १९६ कामगार राहत असलेल्या एका सहा मजली इमारतीमध्ये बुधवारी भीषण आग लागून ४९ जणांचा कोळसा झाला, तर ५० हून अधिक जण जखमी झाले. मृतांपैकी ४८ जणांची ओळख पटवण्यात आली आहे. यात केरळच्या २४ जणासह ४५ भारतीयांचा समावेश आहे.