जळगाव : प्रतिनिधी
जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात विकास दूध फेडरेशनची दूध पावडर घेऊन निघालेला ट्रक मुद्देमालासह गायब झाला आहे. या ट्रकमधून ७५ लाख ४५ हजार ७२० रुपयांची दूध पावडर लखनौ येथे नेण्यात येत होती; परंतु ५ जून रोजी जळगावहून निघालेला ट्रक लखनौ येथे इच्छित स्थळी पोहोचलाच नाही.
याप्रकरणी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात ट्रक मालक व चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकमध्ये (क्र. आरजे ११, जीबी ९५७९) २६ टन पावडर भरून ट्रक मालक रसतम कमलेश बघेल (रा. ग्वाल्हेर, मध्य प्रदेश) आणि चालक फिरोज सरजुद्दीन (रा. आग्रा उत्तर प्रदेश) हे दोघे निघाले. परंतु दूध पावडरने भरलेला ट्रक पाच दिवस उलटूनही इच्छित स्थळी पोहोचलाच नाही. याप्रकरणी ट्रान्स्पोर्ट व्यावसायिक रामदास मोहन थोरवे (४७, रा. मेहरूण) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकमालक रसतम बघेल व चालक फिरोज सरजुदीन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचा ट्रक मुद्देमालासह गायब होण्याच्या या प्रकाराची शहरात चर्चा आहे.